फिडे रेटिंग म्हणजे नेमकं काय?
बुद्धिबळ खेळाची तोंड ओळख झाली आणि पहिली स्पर्धा खेळली की खेळाडू व पालकांच्या मनात घर करून बसतो तो प्रश्न म्हणजे "फिडे रेटिंग म्हणजे नेमकं काय?" ते कसं मिळवायचं ? आणि ते मिळाल्यावर त्याचे फायदे तोटे काय ? अश्या एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. फिडे रेटिंग ही संकल्पना जाणून घेण्यापूर्वी मुळात फिडे म्हणजे काय आणि रेटिंग सिस्टीमचा इतिहासाची थोडक्यात माहिती करून घेणं गरजेचं आहे. "फिडे" (FIDE - Fédération Internationale des Échecs) ही संस्था म्हणजे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ आहे. ही संस्था संपूर्ण जगभरातील बुद्धिबळ खेळाचे नियमन करते आणि खेळाडूंची पात्रता, स्पर्धा, तसेच त्यांची रेटिंग प्रणाली ठरवते.
फिडे रेटिंग म्हणजे काय ?
FIDE Elo रेटिंग प्रणाली १९७० मध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने (FIDE) खेळाडूंच्या रँकिंगसाठी सुरू केली. ही प्रणाली हंगेरियन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ अर्पाड एलो यांनी विकसित केली होती. ही प्रणाली सांख्यिकी मॉडेलवर आधारित असून, खेळाच्या निकालांनुसार रेटिंग मध्ये बदलाव करते. कालांतराने, FIDE ने अचूकता वाढवण्यासाठी K-फॅक्टर आणि इतर नियमांमध्ये सुधारणा केल्या. जही, Elo प्रणाली बुद्धिबळ स्पर्धा, खेळाडूंची श्रेणी आणि टायटल ठरवण्यासाठी महत्त्वाची आहे. सध्याच्या घडीला फिडे कडून खालील प्रकारात रेटिंग दिले जाते. हे तीनही प्रकार एका डावातील एका खेळाडूस मिळणाऱ्या एकूण वेळावर अवलंबून आहेत.
१. स्टॅंडर्ड रेटिंग (एका डावात प्रत्येक खेळाडूस किमान साठ मिनिटे वेळ असल्यास)
२. रॅपिड रेटिंग (एका डावात प्रत्येक खेळाडूस दहा मिनिटा पेक्षा जास्त आणि साठ मिनिटापेक्षा कमी वेळ असल्यास)
३. ब्लिटझ रेटिंग (एका डावात प्रत्येक खेळाडूस दहा मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी वेळ असल्यास)
नवख्या खेळाडूला रेटिंग कसे मिळते ?
मुळात खेळाडूंनी रेटिंग मिळवण्यासाठी फिडे रेटिंग स्पर्धा पूर्ण तयारी व ताकदीनिशी खेळल्या पाहिजेत. जेव्हा एखादा खेळाडू प्रथमच फिडे रेटिंग स्पर्धा खेळत असतो तेव्हा तो/ती काही अटींची पूर्तता केल्यावर फिडे गुणांकन प्राप्त होण्यासाठी पात्र ठरतो. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला फिडे रेटिंग लिस्ट पब्लिश करते आणि ज्या लिस्ट मध्ये खेळाडूने खेळलेली स्पर्धा समाविष्ट असेल त्या प्रमाणे त्या महिन्यात त्या खेळाडूस रेटिंग प्राप्त होते. पहिल्याच स्पर्धेत खेळाडू एकतर पात्रतेचे निकष पूर्ण करू शकतो अथवा अंशतः पूर्ण करू शकतो. अंशतः पात्रता झाल्यास उर्वरित अटींची पूर्तता पुढील स्पर्धेत करता येते. सदर पूर्ततेसाठी एकूण २६ महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला असून तो उलटून गेल्यास त्या आधीच्या स्पर्धांचा समावेश रेटिंगची मोजणी करताना होत नाही.
भारतात होणाऱ्या सर्व फिडे मान्यताप्राप्त स्पर्धांची यादी : येथे क्लीक करा
फिडे रेटिंग कसे मोजले जाते ?
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी, FIDE एक यादी तयार करते ज्यामध्ये त्या रेटिंग कालावधी दरम्यान सर्व रेटेड असलेले गेम्स यादीत समाविष्ट केले जातात. नवीन खेळाडूला रेटिंग मिळवण्यासाठी खालील मुख्य तीन अटींची पूर्तता करावी लागते
१. एकूण पाच रेटेड खेळाडूंशी एकाच प्रकारच्या रेटेड स्पर्धांमध्ये खेळणे (कमीत कमी एक चाल प्रत्येक खेळाडूची आवश्यक).
२. त्या पाच खेळाडूंसोबत झालेल्या डावात किमान अर्धा गुण होणे
३. पर्फोर्मंस रेटिंग किमान १४०० असणे
आता आपल्याला प्रश्न पडला असेल की पाच रेटेड खेळाडूंसोबत एकाच स्पर्धेत खेळणे बंधनकारक आहे का? तर तसे अजिबात नाही. समजा एका स्पर्धेत आपण ३ रेटेड खेळाडूंसोबत खेळलात आणि पुढील २६ महिन्यात आपण कधीही कोणत्याही फिडे रेटेड स्पर्धेत उर्वरित २ खेळाडूंशी खेळून ही अट पूर्ण करू शकता. आपण मिळवलेला प्रत्येक गुण हा आपल्या फिडे प्रोफाईलशी जोडलेल्या खात्यात जमा किंवा वजा होत असतो.
पर्फोर्मंस रेटिंग म्हणजे काय ?
फिडे नियम पुस्तिकेतील (FIDE Handbook) नियमांचा आधार घेऊन आपण एका उदाहरणातून फिडे रेटिंग कसे मिळते ह्याचा अभ्यास करू.
पर्फोर्मंस रेटिंग समजून घेण्यासाठी मुख्यत्वे आपण सरासरी रेटिंग आणि पी - डीपी टेबल यांचा वापर करतो.

१. समजा एखादा खेळाडू ५ फिडे रेटेड प्लेअर ज्यांचे रेटिंग अनुक्रमे १५००, १६००, १७००, १८००, १९००, २००० असे आहे यांच्यासोबत खेळला आणि दोन गुण केले तर त्याचे रेटिंग किती येईल याची मोजणी आपण करू.
- वरील पाच खेळाडूंचे सरासरी (एव्हरेज) रेटिंग १७०० इतके येईल
- खेळाडूने पाच पैकी २ गुण केले आहेत त्यामुळे टेबल ८.१.१ मध्ये आपल्याला २/५ म्हणजेच ०.४० च्या समोरील संख्या सरासरी गुणांमध्ये मिळवावी लागेल. म्हणजेच १७०० + (-७२) = १६२८ इतके त्याचे नवीन फिडे गुणांकन (रेटिंग) येईल.
- समजा त्याच खेळाडूने वर नमूद केलेल्या पाच खेळाडूंसोबत अर्धा गुण केला तर ०.५/५ म्हणजेच ०.१ च्या समोरील संख्या सरासरी गुणांमध्ये मिळवावी लागेल. म्हणजेच १७०० + (-३६६) = १३३४ इतका पर्फोर्मंस त्याने केला आहे असे समजले जाईल व तो १४०० पेक्षा अधिक नसल्याने त्याला रेटिंग त्या रेटिंग लिस्ट मध्ये मिळणार नाही. पुढे त्याने फिडे रेटिंग स्पर्धेत अधिक चांगला खेळ केल्यास तो नवीन रेटिंग साठी रेटिंग साठी पत्र ठरेल.
रेटिंग असलेल्या खेळाडूंचे रेटिंग कसे बदलते ?
रेटिंग असलेल्या खेळाडूचे रेटिंग बदलासाठी K-Factor समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे. प्रत्येक रेटिंग बदलासाठी तो डाव खेळलेल्या दोन्ही खेळाडूंचे रेटिंग आणि त्यांचा K-Factor कारणीभूत असतो. आता त्या संदर्भातील नियमावली समजून घेऊ.
K-Factor चे प्रकार आणि त्याचा परिणाम
FIDE ने K-Factor वेगवेगळ्या खेळाडूंसाठी खालीलप्रमाणे ठरवला आहे:
K-Factor | कोणासाठी लागू आहे? |
40 | नवीन खेळाडूंसाठी (30 सामने पूर्ण होईपर्यंत) |
20 | 2400 पेक्षा कमी रेटिंग असलेल्या खेळाडूंसाठी |
10 | 2400 किंवा त्याहून जास्त रेटिंग असलेल्या खेळाडूंसाठी |
K-Factor जितका मोठा असेल, तितक्या वेगाने खेळाडूचे रेटिंग बदलते.
FIDE रेटिंग बदलण्यासाठी खालील सूत्र वापरले जाते:
Rnew = Rold + K × (S−E)
= नवीन रेटिंग ; = सध्याचे रेटिंग; K = K-Factor ; S = खेळाडूने मिळवलेले गुण (विजयासाठी 1, बरोबरीसाठी 0.5, पराभवासाठी 0); E खालील टेबल प्रमाणे (E म्हणजे अपेक्षित स्कोर)
१. दोन्ही खेळाडूंच्या रेटिंग मधील फरक काढा
२. तो फरक ज्या रेंज मध्ये आहे त्या रेंज समोरील H गटात जास्त रेटिंग असलेल्या खेळाडूचा अपेक्षित E आहे व L गटात कमी रेटिंग असलेल्या खेळाडूचा अपेक्षित E आहे.
समजा, A (१९८५ रेटिंग) आणि B (१८०० रेटिंग) यांच्यात झालेल्या डावामुळे बदललेले रेटिंग काढून बघूया: (असे समजूया की खेळाडू A व B यांचा K - Factor = 40 )
दोघांच्या रेटिंग मधील फरक १८५ असल्याने वरील टेबल ८.१.२ प्रमाणे १९८५ रेटिंग असलेला खेळाडू जिंकण्याची शक्यता ७६% आहे व १८०० रेटिंग असलेला खेळाडू जिंकायची शक्यता २४% आहे म्हणजेच A खेळाडूचा E ०.७६ येईल व B चा E ०.२४ येईल. जर A जिंकला तर A चे नवीन रेटिंग
RA=१९८५ + ४० ×(१ - ०.७६)= १९९४.६ असे येईल
तसेच B खेळाडूचे नवीन रेटिंग
RB= १८०० + ४० (० - ०.२४) = १७९०.४ असे येईल
याच प्रकारे सर्व खेळाडूंच्या रेटिंग मधील फरक काढून स्पर्धेअंती सर्व फरकांची गोळाबेरीज करून एकत्रित बदल फिडे रेटिंग लिस्ट मध्ये समाविष्ट केला जातो.
डायनामिक K - Factor आणि जास्तीत जास्त रेटिंग फरक ४०० :
वरील रेटिंग फरक मोजताना अतिशय महत्वाचे म्हणजे डायनामिक K - Factor आणि जास्तीत जास्त रेटिंग फरक ४०० या फिडे कडून सांगितल्या गेलेल्या सौज्ञा. फिडेच्या नियमाप्रमाणे खेळाडूने एका लिस्ट मध्ये खेळलेले गेम्स आणि K - Factor यांचा गुणाकार जास्तीत जास्त ७०० इतकाच येऊ शकतो. त्यामुळे जर आपला K - Factor ४० असेल आणि आपण एकाच रेटिंग लिस्ट मध्ये समाविष्ट असलेल्या स्पर्धांमध्ये एकूण २० गेम्स खेळलो तर आपला K - Factor हा ७००/२० म्हणजेच ३५ इतका पकडला जाईल. तसेच दोन खेळाडूंच्या रेटिंग मधील फरक मोजताना जर तो ४०० पेक्षा अधिक असल्यास तो जास्तीत जास्त ४०० च पकडावा असा देखील नियम फिडेने घालून दिलेला आहे.
आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा व काही शंका असल्यास chessbaseindiamarathinews@gmail.com या इमेल वर मेल करा !